नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असून, प्रसिद्ध काळाराम मंदिरही त्याला अपवाद नाही, अशा परिस्थितीत नाशिकमध्ये आलेल्या विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासाठी काळाराम मंदिर उघडले जाते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, बंद असलेल्या काळाराम मंदिराच्या केवळ दरवाजाचेच दर्शन घेऊन गोऱ्हे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम दिला. त्यांच्या या कृतीचे व समंजसपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोना संकट, नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी राम प्रभूच्या चरणी नतमस्तक झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळ गोऱ्हे यांनी दिली.
या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना मिळाला पूर्ण विराम -
विधानसभेच्या उपाध्यक्षा आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या बुधवारी नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. दिवसभराच्या दौऱ्यानंतर सायंकाळी त्या नाशिकमधील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी पंचवटीत गेल्या होत्या. त्या मंदिर प्रवेश करतात की नाही किंवा त्यांच्यासाठी मंदिर उघडले जाते की काय?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु, गोऱ्हे यांनी मंदिरात प्रवेश करण्या ऐवजी पुरातन काळाराम मंदिराच्या दरवाज्यावर नतमस्तक झाल्या, तसेच कोरोना महामारी आणि नैसर्गिक आपत्तीतून देशाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
अनेक वेळा मी येथील प्रभू रामाचे दर्शन घेऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रसाद व शाल श्रीफळ दिले आहे, अशी आठवण यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितली. त्यानंतर दर्शन करून त्या पुढील दौऱ्याकडे रवाना झाल्या. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना विराम मिळाला असून, पंधरा दिवसांपूर्वी मंत्री आव्हाड यांनी केलेल्या देवदर्शनाच्या घटनेला मात्र उजाळा मिळाला.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर झाली होती टीका -
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना काळातही थेट नवश्या गणपतीच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली होती. त्यावरून आव्हाड यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे आजच्या नीलम गोऱ्हे यांच्या दौऱ्यात त्यांच्यासाठी मंदिर उघडले जाते की, त्या थेट मंदिरात प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
संकटातून बाहेर पडण्यासाठी राम प्रभूच्या चरणी नतमस्तक -
पंढरपूरचे वारकरी विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन विठ्ठल भेटला असे समजून जातात तसेच मी दर्शन घेतले. कोरोनाच्या काळात डॉक्टर, संशोधक यांच्या कृपेने आपण जीवन जगत आहोत. एका बाजूने कोरोना संकट, दुसऱ्या बाजुला नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी राम प्रभूच्या चरणी नतमस्तक झाले असल्याचे निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.