नाशिक - म्हसरूळ-बोरगड चौफुली याठिकाणी शिवसेनेच्या वतीने एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडल्याने कमळाचे फूल टाकून नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये आंदोलन करण्यात आले आहे.
स्थानिक नगरसेवकांचा निषेध
दरवर्षी पावसाळा आला, की नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न समोर येत असतो. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो, तर कित्येक जणांना कायमच्या अपंगत्वालादेखील सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीदेखील दरवर्षी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने अनेक आंदोलने केली जातात. असे एक आगळेवेगळे आंदोलन आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकमधील म्हसरूळ-बोरगड चौफुली या ठिकाणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आले. बोरगड-चौफुली हा रस्ता गुजरात-सापुतारा आणि वणी-दिंडोरी हायवेला जोडणारा आहे. यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याने शिवसेनेच्या वतीने नगरसेवकांच्या पक्षाचे कमळ चिन्ह हे रस्त्यांवरील खड्ड्यात लाऊन स्थानिक नगरसेवकांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे.
स्थायी सभापतींच्या प्रभागात खड्डेमय रस्ते
या आगळ्यावेगळ्या आंदोलनामध्ये या चौफुली परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीदेखील सहभाग घेतला होता. तर या ठिकाणचे रस्ते लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हा प्रभाग महानगरपालिकेचे स्थायी सभापती गणेश गीते यांचा असून सभापतींच्या वॉर्डात एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर शहराचे काय, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याने वाहन कमळाचे फूल तुडवत जातील, तेव्हा सत्ताधारी भाजपाला खड्डे बुजवण्याचे शहाणपण येईल, असे यावेळी आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सांगितले.