नाशिक - लक्ष्मीपूजनापासून एअर इंडियाची उप-कंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिक-पुणे विमानसेवेला सुरुवात होणार आहे. यासाठी तिकीट बुकिंगला दसऱ्या पासून सुरुवात करण्यात आली असून, नाशिक ते पुणे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
केंद्र सरकारच्या उड्डाण योजने अंतर्गत शहरांना जोडण्यासाठी नाशिक मध्ये विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत एअर इंडियाची उप-कंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिक- पुणे विमान सेवेला येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. संबंधित विमानसेवा आठवडाभर सुरू राहणार असल्याचे अलायन्स एअर कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याआधी नाशिक-पुणे विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद असून देखील एअर डेक्कन कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांची सेवा खंडित झाली होती.
हेही वाचा सिंधुदुर्ग: चिपी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे धूसर, पालकमंत्र्यांवर विरोधकांची टीका
यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अलायन्स एअर कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयात प्रस्तव दिला होता. या प्रस्तावाला हवाई वाहतूक मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला असून, येत्या 27 ऑक्टोबरला ओझर विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीचे विमान उड्डाण करणार आहे.
अशी असेल विमान सेवा
70 आसनी विमान
उड्डाण योजनेअंतर्गत 35 सीट राखीव
तिकीट दर 1600 रुपये
सोमवार ते शुक्रवार सेवा : दुपारी 2. 55 ते 3.45 प्रवासाची वेळ
शनिवारी : सकाळी 8.30 ते 9.30 प्रवासाची वेळ
रविवारी : सकाळी 10 ते 11 प्रवासाची वेळ