नाशिक - यंदा नाशिककरांना नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जपूनच करावी लागणार आहे. कारण, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारी पहाटे 6 पर्यंत संचाबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी पत्रकार परिषदेत 31 डिसेंबरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या संचाबंदीची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारकडून रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यंदा नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत शांततेत करावे, यासाठी शहर पोलीस हद्दीत 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर 35 ठिकाणी नाकेबंदी राहणार आहे. पोलिसांनी सार्वजनिक मोकळ्या जागेत जमावबंदी केली आहे. घरातच नववर्ष स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा-नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
रात्री 11 नतंरही हॉटेल सुरू असल्याचे कळविण्याचे नागरिकांना आवाहन-
गच्चीवर मद्यपान, साउंड सिस्टीम व धांगडधिंगा दिसल्यास थेट कारवाई करणार असल्याचे निशाणदार यांनी सांगितले आहे. शहराबाहेर पार्टीचे नियोजन असेल तर पहाटेपर्यंत तिथेच थांबावे. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. शहरात हॉटेल रात्री 11 पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी रात्री 11 नतंर सुद्धा हॉटेल सुरू असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी
पोलीस कंट्रोल रूमला कळवावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त यांनी केले. 31 डिसेंबरला रात्रभर पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, इंग्लंडमधून आलेल्या काही भारतीयांना नवीन प्रकारचा कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.
राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी-
मदत व पुनर्वसन विभागाने आज काढलेल्या परिपत्रकात कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहे. याआधी 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान सरकारने संचारबंदी लागू केली होती.