नाशिक- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक पोलीस देखील खबरदारी म्हणून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरात गस्त घालत आहेत. मात्र, नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट समितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, किरकोळ भाजी विक्रते एकाच ठिकाणी हजारोच्या संख्येनं गर्दी करत असल्याने ज्या उद्देशाने सरकारने संचारबंदी लागू केली तोच आदेश इथे पायदळी तुडवला जात आहे.
नाशिक शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसून, आता पर्यंत 60 कोरोना संशयित रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यामुळे नाशिककर निर्धास्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. संचारबंदी सुरू असली तरी सकाळी मॉर्निंग वॉक पासून किरकोळ कामासाठी गाड्या घेऊन निर्धास्त घराबाहेर पडत असल्याने पोलिसांनी आता याची गंभीर दखल घेतली आहे. सकाळी मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत कारवाई केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. शहरात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे.
संचारबंदी मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, फळ, वैद्यकीय सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, नागरिक याचा गैरफायदा घेतायेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकच्या मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, किरकोळ भाजी विक्रते यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने हा बाजार पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट समिती मध्ये हलवला. मात्र, याठिकाणी सुद्धा हजारोच्या संख्येने वाहन आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी काळात होणाऱ्या या गर्दीचे काय यावर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार असा प्रश्न नाशिकरांनी उपस्थित केला आहे.