नाशिक - पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik CP Deepak Pandey) यांनी बदलीचा अर्ज केला आहे. यात कुठलेही राजकारण अथवा दबाव नसून, मी वैयक्तिक कारणासाठी अर्ज केल्याचे पांडे यांनी सांगितले आहे. पांडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दिवसभर शहरात चर्चा रंगली होती.
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची शिस्त आणि कायद्यात राहून काम करणारे अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपक पांडे यांनी काही गाजलेले निर्णय घेतले होते. त्यात नो हेल्मेट नो पेट्रोल उपक्रम, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहुन रत्नागिरीला पोलीस पाठवले होते. या कारणास्तव पोलीस आयुक्त पांडे नेहमी चर्चेत राहिले. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी नववर्ष स्वागत कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली. यावेळी खुद्द पालकमंत्री यांना या प्रकरणात मध्यस्त्री करावी लागली होती.
हेल्मेटसक्ती निर्णयामुळे संघर्ष- हेल्मेटसक्तीवरून पेट्रोल पंप चालक आणि पोलीस आयुक्तांचा नवा संघर्ष समोर आला होता. विना हेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल दिले तर पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नोटीस का बजावू नये असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला. यावर पेट्रोल पंप चालकांनी पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध करत गुढीपाडव्याला 2 मार्च रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अशात आठ दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त पांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी स्वतः बदलीसाठी गृह विभागाकडे अर्ज केल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. आता यावर गृह विभाग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.