नाशिक - सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शहर बस सेवेच्या पहिल्या दिवशीच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भाजपने लावलेले स्वागत फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानकपणे हटवले. त्यानंतर भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्य़ासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने, त्यांच्या स्वागतासाठी भाजपाने स्वागत फलक लावले होते. ते फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक हटले. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
'फलक पुन्हा लावण्याची भाजपची मागणी'
नाशिक महापालिकेची बससेवा आजपासून सुरू होणार आहे. या बस सेवेचे उद्घाटन करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टरवरून शहरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स महापालिकेने अचानक हटवले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी कालिदास कला कलामंदिराच्या प्रवेश द्वारावर एकत्र येत रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, बस सेवेचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून प्रशासनाने केलेला हा प्रयत्न आहेका? असा आरोपही यावेळी भाजपा नगसेवकांनी केला आहे.
'फडणवीस यांच्यावर हा रोष का?'
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्ह्याच्या एक दिवसीय द्वौरावर आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले फलक तसेच आहे. मात्र, आता फडणवीस यांच्यावर हा रोष का? असा सवाल भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, केवळ पालकमंत्री भुजबळ यांचा फोटो नसल्याने हे फलक हटवण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना फेटाळून लावत परवानगी घेतली नसल्याने हे फलक हटवण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बससेवेच्या लोकार्पण सोहळ्याच्या काही वेळेआधीच पुन्हा एकदा मनपा प्रशासन आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याने सध्या याचीच चर्चा शहरात सुरू आहे.