नाशिक: राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेच आहे. ( MPSC exam preparation ). काही तरुण एमपीएससीच्या परीक्षेसाठी आठ ते दहा वर्षांपासून तयारी करत आहेत. रिक्त जागा हजारांच्या घरात असताना त्यासाठी अर्ज मात्र लाखोच्या संख्येने येत आहेत. अशात आता वय वाढल्याने या तरुणांना ना नोकरी मिळते आहे ना त्यांचे लग्न होते, यामुळे पालकांची चिंता वाढते आहे. या बाबतीत या क्षेत्रातील तज्ञांचे काय मत आहे हे जाणून घेऊया. ( MPSC exam expert advice )
स्पर्धा परिक्षेच्या तयारीने होतो सर्वांगीण विकास: स्पर्धा परीक्षेची तयारी दहावी-बारावीपासूनच सुरू केली तर विविध पदांची परीक्षा देताना सर्वांना आपली क्षमता किती आहे याचा अंदाज येतो. भविष्यात दुसऱ्या व्यवसायाची किंवा नोकरीची संधी मिळाली तरी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करून तयारी केली तर अधिकारी बनण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते, असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचे म्हणणे आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करताना सर्वांगीण विकास साधला जातो, त्यामुळे असे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, असे तज्ञांचे याबाबतचे मत आहे.
किती वर्षे करावा प्रयत्न? : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी किती वर्ष तयारी करावी याचे नियोजन करणे कठीण आहे.अधिकारी बनण्याची शेवटची संधी केव्हा मिळेल हे त्यावेळच्या तयारीवर अवलंबून असते. तसेच प्रत्येक शेवटची संधी म्हणजेच अधिक अभ्यास आणि अधिक तयारी असल्याने वयोमर्यादा असेपर्यंत प्रयत्न सुरूच ठेवावेत असं सांगतात.
लग्नाचा निर्णय योग्य वेळी घ्यावा: मुलांनी अधिकारी व्हावं असं स्वप्न अनेक पालकांचे असते यासाठी त्यांना चांगला अभ्यास करून यश संपादन करावे असं वाटतं. मात्र योग्य वयात त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे अन्यथा वेळ निघून जाऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात.
एमपीएससीचा अभ्यास कसा करावा? : एमपीएससीच्या तयारीसाठी मागील दोन वर्षांच्या एमपीएससी परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचा अभ्यास करा. विश्लेषण करा. पुस्तकातील भाषा बघा आणि मगच संदर्भ पुस्तक निवडा. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि मागील प्रश्न पत्रिका यांचा एकत्रित अभ्यास करूनच पुस्तके निवडावे.
दररोज वर्तमानपत्र वाचावे: चालू घडामोडी हा विषय आपल्याला समजून घेण्यासाठी दररोज एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला हवे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची संख्या ही कायम जास्त असते. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आयोगाचा भर जास्त असतो. आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याच्याशी निगडित चालू घडामोडींवर आपल्याला प्रश्न येत असतात. चर्चेतील व्यक्ती, संस्था पुरस्कार आणि त्यांची कार्ये या सर्वांशी निगडीत चालू घडामोडींवर लक्ष असू द्यावे.