नाशिक - शेतकरी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच 14 बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या कृषि उत्पन्न बाजार समितीबाहेर शेतकरी, बाजार समिती संचालक, कर्मचारी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांसोबतच बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही देशोधडीला लावणारा कायदा
शेतकरी कायदा हा शेतकरी तसेच बाजार समितीविरोधात असून यामुळे शेतकऱ्यांसोबतच बाजार समिती कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा शेतकरी कायदा त्वरित रद्द करावा आणि शेतमालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
बाजार समितीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
भारत बंद आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
जिल्ह्यातील 14 बाजार समित्या बंद
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये सहभागी होत नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. तसेच ठिकठिकाणी शेतकरी, बाजार समिती संचालक, कर्मचारी यांनी एकत्रित येत आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करून शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी केली