नाशिक - शहरातील मातोरी रस्त्याने मखमलाबादकडे जाणाऱ्या शेतमजूरांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या पीकअप जीपने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, हे चारही जण धडक बसल्यानंतर दूरवर फेकले गेले होते. या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह त्याचे आई-वडील आणि दुचाकीचालक असे चारजण जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर जीप चालक गाडी सोडून फरार झाला आहे.
आज (सोमवार दि. 13 जुलै) रोजी दुपारच्या सुमारास मखमलाबादच्या दिशेने दुचाकीवरून (एम. एच १५ सी.एल. २९८८) लहान चिमुकल्याला घेऊन आई-वडीलांसह गाडीचालक असे तीन शेतमजुर प्रवास करत होते. याचवेळी मखमलाबाद बाजूने भरधाव जाणाऱ्या पीकअप जीपच्या (एम.एच. १५ ई.जी. ९६३३) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेजण दूरवर फेकले गेले. या अपघातात केशव खोडे, मीराबाई खोडे (सर्व रा. ओझरखेड) आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा अनिल यासह दुचाकीचालक दिलीप नामदेव दिवे (रा. सापगाव, ता. त्र्यंबकेश्वर) हे चौघे जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर जीपचालक वाहन सोडून पळून गेला.
हेही वाचा - पश्चिम बंगालमधील भाजप आमदार देबेंद्र राय यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला
स्थनिक नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवले. या अपघातप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी फरार जीप चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच जीपच्या नोंदणीकृत क्रमांकावरून या चालकाचा शोध घेतला जात असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.