नाशिक - शहरातील नागरिक सायकलिंगकडे वळत असून पर्यावरण रक्षणासाठी आणि सायकलिस्टच्या सुरक्षेसाठी नाशिक शहरात कायमस्वरूपी सायकल ट्रॅक हवा, अशी मागणी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन केली आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशिक शहराकडे झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून बघितले जाते. तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू असल्याने नाशिक अधिकच स्मार्ट होणार आहे. मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत असून यामुळे वायू प्रदूषणदेखील वाढत आहे. अशात आता नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने पर्यवरण रक्षणासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा, म्हणून मोहीम उघडली आहे. यासाठी शहरात कायमस्वरूपी सायकल ट्रॅक व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
![Cyclists](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-cycliststory-7204957_29122020181936_2912f_02391_651.jpg)
शहरात सायकल चालवणे कठीण
नाशिकमध्ये वाढत्या लोकसंख्या सोबत वाहनाची संख्यादेखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. शहरातील अरुंद रस्ते, वाहनतळाचा अभाव यामुळे वाहनधारक सर्रासपणे रस्त्यावर वाहने पार्क करत आहेत. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे आणि ह्यामुळे सायकलिस्टला सायकल चालवणेदेखील कठीण होत असून किरकोळ अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे.
सायकलिस्टच्या संख्येत वाढ
पर्यावरण संरक्षणासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने नागरिक आता सायकलचा पर्याय निवडत आहेत. दिवसेंदिवस सायकलिस्टच्या संख्येत वाढ होत असल्याचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने सांगितले आहे. 2010मध्ये अवघ्या 25 सायकलिस्टला घेऊन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. आज ही संख्या 2500वर जाऊन पोहोचली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो सायकलिस्ट सायकलने पंढरपूर आणि शेगावची वारी आणि 2 ऑक्टोबर महात्मा जयंतीनिमित्त पर्यवरणाचा संदेश देत नाशिकहून मुंबईला जात असतात.
स्मार्ट सिटीअंतर्गत सायकल ट्रॅक
सुरवातीला नाशिक-त्र्यंबकेश्वर हे रस्ता चौपदरीकरण होत असताना या रस्त्याच्या बाजूने 30 किलोमीटर अंतराचा सायकल ट्रॅक मंजूर करण्यात आला होता. मात्र या ना त्या कारणाने हा ट्रॅक होऊ शकला नाही. आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर सिग्नल ते सातपूरपर्यंत 6 किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने म्हटले आहे.
सायकल टू वर्क
पर्यावरण रक्षणासाठी नाशिक शहरातील सर्व शासकीय अस्थापणातील अधिकारी, कर्मचारी सर्व सरकारी, खासगी शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एक दिवस सायकल टू वर्क ही मोहीम सुरू करावी, अशी मागणी नाशिक सायकलिस्ट यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांकडे केली आहे.