मुंबई - येत्या विधानसभा निवणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिंडोरी मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले तसेच दिलीप राऊत यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाले यांनी 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. या दोघांच्या प्रवेशामुळे नाशिकमाधील दिंडोरीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली होती. यामुळे खासदार भारती पवार यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने दिंडोरीतील ही घरवापसी शिवसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना, वन नेशन हा शिवसेनेचा जुना अजेंडा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेनेने स्वीकारलेल्या भूमिका मोदी सरकारने घेतल्या आहेत. समान नागरी कायद्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे राऊत यांनी म्हटले.
देश हितामध्ये धर्म येऊ देऊ नका; असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. एक देश म्हटल्यावर सगळं एकच असलं पाहिजे, असे मत वन नेशन च्या मुद्दयावर त्यांनी व्यक्त केले.एक देश म्हटल्यावर त्यात सगळं आलं. स्थानिक भाषेचं महत्त्व त्या त्या राज्यात असलेच पाहिजे,यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.