नाशिक - महापालिकेच्या सिटीलींक बसचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फोटो आणि बुडवलेल्या तिकिटांची माहितीही सोशल मीडियावर प्रसिद्ध करणार असल्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले आहे. प्रवाशांकडून कमी पैसे घेऊन तिकीट न देणाऱ्या कंडक्टरवरही दंडात्मक कारवाईसह त्यांना तुरुंगात टाकणार असल्याची माहितीही यावेळी महापालिका आयुक्तांनी दिली आहे.
सिटी लिंक अॅप बससेवेच्या संचलनासाठी एनएमपीएमएल कंपनी स्थापन केली असून मनपा आयुक्त त्याचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे घेत पवार यांनी पहिल्याच बैठकीत बस चालवणाऱ्या आणि वाहक पुरवणाऱ्या ठेकेदारांना जोरदार दणका दिला आहे. काही महिन्यात बस सेवेला प्रचंड प्रतिसाद दिसत असला, तरी त्याचे परिवर्तन उत्पन्नवाढीसाठी दिसत नव्हते. ही बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी गुप्तपणे नेमके काय सुरू आहे, याची माहिती घेतली. त्यात धक्कादायक बाब पुढे आली आहे. सिटी लिंकच्या माध्यमातून एकूण 196 बस रस्त्यावर धावत असून त्यासाठी 592 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी 35 तपासणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर मासिक सात लाख याप्रमाणे वर्षभरात 84 लाख रुपये खर्च होत आहेत. इतका मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही तिकीट बुडवण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
तिकिटात भ्रष्टाचार झाल्याचे उघड - आयुक्त रमेश पाटील यांनी केलेल्या चौकशीत तिकीटात भ्रष्टाचार समोर आला आहे. 25 रुपये तिकीट असेल तर 15 किंवा 20 रुपये प्रवाशांकडून घेऊन संबंधित व्यक्तीला तिकीट न देता मोफत प्रवास करून दिला जात होता. ही बाब जेव्हा तिकीट तपासणीस नेमले तेव्हा पुढे आली. जुलै 2021 पासून ते एप्रिल 2022 पर्यंत 72 हजार 133 फेऱ्या तपासण्यात आल्या आहेत. त्यात 871 फुकटे प्रवासी सापडले. या प्रवाशांकडून 3 लाख 5 हजार तर जबाबदार 151 वाहकांकडून 5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
काय करणार कारवाई.. - आता विनातिकीट प्रवासी आढळला तर त्याच्याकडून तिकिटासह दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यासह त्याची माहिती फोटोसह तिकीटाची रक्कमही सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहे. फारच गंभीर प्रकार असल्यास प्रसंगी वर्तमानपत्रात प्रसिद्धीचा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. यापूर्वी विनातिकीट प्रवासी आढळला तर कंडक्टरवर पहिल्या वेळी 5 हजार दुसऱ्या वेळी 10 हजार तर तिसऱ्यांदा बडतर्फीची कारवाई केली जात होती. त्यानुसार 151 वाहकांपैकी 61 वाहकांना बडतर्फ केले गेले. आता यापुढे जाऊन अशा वाहकांनी महापालिकेच्या रक्कमेची अफरातफर केली, तर थेट पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले आहे.