नाशिक - अमेरिकेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिका संसद भवनात घुसून तोडफोड, हाणामारी केली. या घटनेमुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले हे ट्रम्प यांच्यावर चांगलेच नाराज झाले असून ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेले कृत्य लोकशाहीला शोभणारे नसून ट्रम्प यांनी पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर केला आहे. या कृत्यामुळे त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला आहे. हा लोकशाहीचा अवमान असून भारतातही आमची नाचक्की होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी पराभव स्वीकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
रिपब्लिकन नावाचा अवमान..
आठवले म्हणाले की, माझ्या पक्षाचे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी जनमताचा कौल अमान्य करून रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अपमान केला. त्यांच्या या कृतीमुळे अमेरिकेत लोकशाही धोक्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाने असे वागणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा पक्ष स्थापन केला. प्रजासत्ताक म्हणजे लोकांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून त्यांनी पक्षाला हे नाव दिले. हेच नाव अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाला देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी आता पराभव स्वीकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे. शक्य झाल्यास मी ट्रम्प यांच्याशी फोन वर चर्चा करेल, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - फ्लिपकार्ट म्हणतंय कसं काय?...मराठी भाषेचा केला समावेश