नाशिक - शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच वाद मिटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहिला नाही. तो राग इतरांनी का मनात ठेवावा. इतरांनीही आपल्या मनात राग ठेऊ नये. माझी कुणाविरुद्धही तक्रार नसून माझ्याकडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो, असे सांगत आमचे मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्री असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांच्या आरोपाला दिले आहे.
उगाचच माध्यमांसमोर जाऊन आपली भूमिका मांडू नये, चर्चा करून प्रश्न सुटू शकतो - भुजबळ
आमदार कांदे यांनी आरोप केल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.आमदार कांदे यांच्या अडचणी असतील तर त्यांना चर्चा करण्याचा पूर्णपणे अधिकारी आहे. त्यांच्याशी मी समोरा-समोर चर्चा करण्यास तयार आहे. उगाचच माध्यमांसमोर जाऊन आपली भूमिका मांडू नये. चर्चा करून प्रश्न सुटू शकतो, असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
निधी वाटपाचे अधिकार माझे नाही - भुजबळ
कोरोनाच्या काळात जिल्हा नियोजनचा केवळ यंदा फक्त दहा टक्के निधी मिळाला असून तोही कोरोनावर खर्च करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार निधीची नियोजन करण्यात आलेले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अजून सहा महिने बाकी आहेत. वर्ष संपण्यासाठी उर्वरीत निधी आला की ज्यांची अडचण असेल त्यांची अडचण दूर केली जाईल. त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. निधी वाटपाचे अधिकार माझे नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व संबंधित यंत्रणा आहे. सर्व तालूक्यांवर समान लक्ष ठेवणे हे माझे काम आहे. लोकप्रतिनीधींची अडचण दूर करणे माझे काम आहे. जिल्हा नियोजन निधीचा वाद कोर्टापर्यंत जाणे योग्य नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना व अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थिती यामध्ये झालेले नुकसान यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर असून ते सोडविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा असून या वादाला मी पूर्णविराम देत आहे, असे पालकमंत्री भुजबळ म्हणाले.
हेही वाचा - छगन भुजबळांना पालकमंत्री पदावरुन हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदेंची मागणी