नाशिक - दोन दिवसांनी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Vidhan Parishad Election 2022 ) महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) सर्व तीनही पक्षाचे उमेदवार निवडुन येतील, असा आत्मविश्वास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, भाजपा पेक्षा महविकास आघाडीचे आमदार जास्त आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे मत मिळाले नाही तरी फार काही परिणाम दिसणार नाही. भाजपाचे उमेदवार 4 सहज निवडून येतील, पण त्यांनी 5 उमेदवार दिले असल्याने ते सुद्धा प्रयत्न करतील. मात्र, केंद्रीय यंत्रणांचे दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असे म्हणत भुजबळांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेसोबतच्या अपक्ष आमदारांसोबत चर्चा - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत असलेल्या अपक्ष आमदारांना संपर्क करण्यात आला आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर अपक्ष आमदारांच्या राहणाऱ्या मतांसाठी हा संपर्क करण्यात आला होता. आता सध्या तीनही पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी व्यवस्था करत आहेत. मात्र अंतिम क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसोबत बैठक घेऊन उमेदवारांच्या मतांच्या कोट्याबाबत आढावा घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराचा कोटा ठरवून त्याबाबत मतदान करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Vidhan Parishad Elections : 'राज्यसभेची परिस्थिती वेगळी, विधान परिषद निवडणुकीत मविआचे सहा उमेदवार जिंकणार'