नाशिक- लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना बाहेर निघण्यास मनाई असताना सिडको भागात मात्र टवाळखोर गुंडांचा उपद्रव सुरू आहे. चौकात बसायला नागरिकांनी विरोध केला म्हणून 14 चे 15 जणांच्या टोळक्याने नागरिकांच्या घरावर दगडफेक करीत अनेक दुचाकी सायकल रस्त्यावर पाडून दहशत निर्माण केली. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास सिंहस्थ नगर, तुळजाभवानी चौक येथे काही टवाळखोर युवक अंमली पदार्थाची नशा करत होते. हा एक प्रकार तेथील नागरिकांच्या लक्षात येताच काहींनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने युवकांनी त्यांच्या इतर 14 ते 15 साथीदारांना बोलून घेत या चौकातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर रस्त्यातील दुचाकी ढकलून देत त्यांचे नुकसान करीत नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली आणि हा प्रकार करुन तेथून त्यांनी पळ काढला.
या संपूर्ण घटनेमुळे घाबरलेले नागरिक रस्त्यावर जमा झाले होते. घटनेनंतर काही नागरिकांनी तक्रार करण्यासाठी अंबड पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा वरिष्ठांशी संपर्क साधून या घटनेबाबत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेत तब्बल 14 ते 15 गुंड असताना पोलिसांनी केवळ 4 च संशयित दाखवले आणि शिवाय घडलेल्या घटनेला पोलीस गांभीर्य घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेतील टवाळखोर सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत.