नाशिक - नाशिकचे ग्रामदैवत म्हणून श्री काळाराम मंदिराची ओळख आहे. या मंदिराच्या राम आणि गरुड रथाला 247 वर्षाची परंपरा आहे. चैत्र शुल्क एकादशीला निघणाऱ्या श्रीराम आणि गरुड रथाच्या यात्रेने आज नाशिक परिसर दुमदुमून गेला.
पेशवेकाळापासून म्हणजे १७७२ सालापासून नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या रथ उत्सवाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे नाशिकमधील अनेक भाविक यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
असा आहे रथ-
श्रीरामाचा हा रथ पूर्णपणे सागवानापासून तयार करण्यात आला आहे. रथाच्या पुढच्या बाजूने लांब दोरी असते तशीच मागील बाजूनेदेखील जाड दोरी असते.
अशी आहे रथयात्रा आणि रथ -
या रथात भगवान श्रीरामच्या पादुका विराजमान होत असतात. या पादुका गरुड रथामधून नाशिकमधील भाविकांच्या दर्शनासाठी जात असतात. गरुड रथ हा गोदावरी नदी ओलांडून मध्य नाशिक मधून दहीपूल, मेनरोड,बोहरपट्टी फिरून कपूर थळा येथे येत असतो. राम रथात भगवान श्रीरामाच्या तांब्याच्या बहुमूर्ती विराजमान असतात. हा रथ नदी घाट ओलांडून नदीपलीकडे नेला जात नाही. त्यामुळे हा रथ गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखाली म्हसोबा पटांगणावर भाविकांच्या दर्शनासाठी उभा असतो.