नाशिक - ऑस्ट्रेलिया येथे पर्यटनासाठी जाऊन आलेले इगतपुरी येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना तपासणीसाठी आरोग्य पथकाने होम क्वारन्टाईनसाठी सूचित केले होते. यानंतर चौघेही फरार झाले होते. ही माहिती समजताच आरोग्य पथकाने पोलिसांच्या मदतीने चौघांचा तातडीने शोध घेतला. हे सर्वजण नाशकात सापडले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव नाशकात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन वेळोवेळी योग्य ती काळजी घेत आहे. परदेशातून किंवा इतर शहरातून कोरोना बाधित रुग्ण शहरात येऊ नये म्हणून टोलनाक्यावरच प्रवाशांची तपासणी देखील केली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणीदेखील नाशिक वैद्यकीय विभागाकडून केली जाते. यात अनेक परदेशी नागरिक शहर सुरक्षित रहावे म्हणून शासनाला सहकार्य करत आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया येथून काही दिवसांपूर्वी नाशकात परतलेले चौघे फरार झाल्याचे समजताच वैद्यकीय पथक आणि पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात यापैकी कोणालाही कोरोना सदृश्य लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, प्राथमिक तपासणीत जरी सगळे ठीक असले तरी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तपासणीनंतर या चारही रुग्णांबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.