नाशिक - जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत तसेच नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नसल्याने महामारीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना देखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाले असले, तरी या विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णतः संपलेला नाही. दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी या परिस्थितीचे भान ठेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांनी देखील विना मास्क आलेल्या व्यक्तींना वस्तूंची विक्री करून नये. तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणाना सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. यादृष्टीने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा
दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांवर होऊ शकतो. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. हा विषाणू फुप्फुसांवर मारा करतो. त्यामुळे आवाज व प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीत कमी करा, असे भुजबळ म्हणाले. तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी आणि सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ नेऊ नये, असे ते म्हणाले. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी शासनास व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.