नाशिक- नाशिकच्या ओझर विमानतळाहून 19 ऑक्टोबर पासून गोवा आणि हैदराबादसाठी स्पाईसजेट कडून सेवा सुरू केली जाणार आहेत. बहुप्रतीक्षित सेवा दिवाळीच्या सुट्टी पूर्वीच सुरू होत असल्याने नाशिककरांना दिवाळीची सुट्टी गोव्यामध्ये घालवण्याची संधी चालून आली आहे.
पावणेदोन तासात आता नाशिकहून गोव्याला पोहोचता येणार असल्याने पर्यटकांदेखील चालना मिळणार आहे. आठवड्याचे सातही दिवस 189 आसान क्षमता असलेल्या बोईंग विमानद्वारे ही सेवा देण्यात येणार आहे. उडान योजने अंतर्गत सवलतीच्या दरात म्हणजे प्रति आसन 2300 ते 2400 रुपये एकेरी मार्गावरील तिकिटाचे दर असून शकतात. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गोवा, अहमदाबाद, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद, भोपाळ, हिंडन यासाठी नाशिक विमानतळाहून सेवा मिळणार होत्या. त्यापैकी अहमदाबादसाठी दोन आणि हैदराबादसाठी एक विमानसेवा रोज उपलब्ध असणार आहे. गेल्या वर्षी 15 जून पासून दिल्ली- नाशिक -दिल्ली सेवा जेट एअरवेजने सुरू केली होती, मात्र जेट एअरवेज आर्थिक अडचणीत आल्यानंतर अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असतानाही ही सेवा बंद पडली.
स्पाइस जेटची सेवा घोषित झाल्यानंतर येत्या दोन-चार दिवसात इंडिगोकडूनही नाशिक-हिंडन या विमानसेवेची घोषणा होईल. जेट एअरवेजच्या नाशिक-दिल्ली मार्गावर एअर इंडिया 15 सप्टेंबरपासून सेवा देणार आहे. लवकरच उर्वरित शहरात विमानसेवा सुरू होईल, असं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.