नाशिक - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नई तालीम या शिक्षण प्रणालीचा प्रसार होण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती होण्याच्या उद्देशाने गांधीजींचे त्रंबक रस्ता परिसरातील इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये सर्वात मोठे धातूशिल्प साकारण्यात आले आहे. शिक्षक अभ्यासक सचिन विलास जोशी यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आले आहे. तसेच श्याम लोंढे यांनी या धातूशिल्पाची निर्मिती केली आहे.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांचे अशाच प्रकारचे शिल्प साकारण्यात आले होते. यानंतर प्रथमच जागतिक स्तरावर महात्मा गांधीजींचे सर्वात मोठे स्तंभ धातूशिल्प साकारण्यात येत आहे.
एका विशिष्ट भागात उभे राहिल्यानंतर गांधीजींच्या चेहऱ्याची प्रतिमा दिसते. कलाकृती जमिनीपासून पंचवीस फूट उंच आहे.
महात्मा गांधीजींची शिक्षण प्रणाली जगासमोर येण्याच्या उद्देशाने या धातूशिल्पाची निर्मिती केली असल्याचे शिक्षण अभ्यासक जोशी यांनी सांगितले. 30 लेझर कट मधून बनवलेले धातूशिल्प आमच्यासाठी महात्मा गांधीजींचे 30 शिक्षण तत्त्वे असल्याचे ते म्हणाले. हे सर्वात मोठे धातूशिल्प पाहण्यासाठी विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक या निमित्ताने नक्कीच नाशिकमध्ये येतील असे सचिन जोशी यांनी म्हटले आहे.
जगामध्ये मोठ्या कलाकारांनी महात्मा गांधीजींवर विविध कलाकृती सादर केल्या असून, या निमित्ताने मला एक वेगळी कलाकृती निर्माण करण्याची संधी मिळाल्याचे शिल्पकार शाम लोंढे म्हणाले. नेल्सन मंडेला यांच्या कलाकृतीवर प्रेरित होऊन ही निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गांधींचे हे सर्वात मोठे धातूशिल्प 2 ऑक्टोबर, 30 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 5 सप्टेंबर या दिवशी संपूर्ण जगातील पर्यटकांना बघण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.
शिल्पाची वैशिष्ट्ये
30 लेझर कट स्टील कॉलम (स्तंभ)
20 फूट उंची, पंधरा फूट रुंदी, जमिनीपासून एकूण 25 फूट उंची
सहा महिन्यात साकारले शिल्प
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
2020 मध्ये प्रकाशित होणाऱ्या ग्रँड मास्टर कॅटेगरीमध्ये निवड