नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स कंपनी लगत असलेल्या आहेर इंजिनिअरीग कंपनीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी मिळून कंपनीच्या मॅनेजरवर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी ( काल ) सकाळच्या सुमारास घडली. नंदकुमार आहेर (५०, रा. महात्मा नगर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यातील एक संशयित आरोपी गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरु आहे. अवघ्या २० दिवसांच्या अंतराने नाशिक शहरात तब्बल ८ हत्येच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अशी झाली हत्या : पोलिसांच्या प्राथमिक तपासात १८ ते २० वयोगटातील चार संशयितांपैकी एकाच्या आईला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून आहेर यांचा खून झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेर इंजिनिअरीग कंपनीत नंदकुमार आहेर हे व्यवस्थापक होते. संशयित मारेकऱ्यांनी रेकी करून नंदकुमार यांचा खून केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास चौघे संशयित कंपनीजवळ उभे होते. नंदकुमार आहेर हे सकाळी १० वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारावर कारमधून उतरल्यानंतर संशयितांनी आहेर यांच्यावर तलवार व चाॅपरने वार केले. हल्ला केल्यानंतर संशयित दुचाकीवरून पसार झाले. आहेर यांनी मदतीसाठी आवाज दिल्याने कंपनीतील कामगार दिपक नेरकर, सचिन चौधरी, अमोल शिंदे यांनी जखमी आहेर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच आहेर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार व चॉपर जप्त केले आहेत.
हेही वाचा - Kushivali Dam Scam : कुशिवली धरण भूसंपादन घोटाळा; आतापर्यंत ४३ आरोपींना अटक, माजी सभापतीच्या पतीलाही अटक