नाशिक - पाकिस्तानातून आलेली मूकबधीर गीता ही आमची मुलगी आहे, म्हणून देशातून चाळीस कुटुंबाने दावे केले आहेत. यात महाराष्ट्रातून तीन कुटुंबांनीं दावे केले असल्याचे आनंद सर्व्हिस संस्था यांनी सांगितले आहे.
कोण आहे गीता?
अंदाजे ३० वर्षे वयाची मूकबधीर गीता ही बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती. देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागात फिरत आहे.
या राज्यातील कुटुंबांनी केला दावा
गीता ही आमची मुलगी आहे असा दावा देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगाणा, बिहार, झारखंड या राज्यातील चाळीस कुटुंबांनीं केला आहे. या कुटुंबांपर्यंत गीताला घेऊन जाण्यासाठी इंदौरमधील आनंद सर्व्हिस संस्था मदत करत आहे.
अनेकांची डीएनए चाचणी
गीता ही आमची मुलगी आहे असा दावा करणाऱ्या अनेक आई-वडिलांची दिल्ली येथे डीएनए चाचणी करण्यात आली आहे. मात्र, या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असून, एकही चाचणी गीताच्या डीएनएसोबत जुळली नाही.
नाशिकच्या रमेश सोळसे यांनी काय केला होता दावा?
लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे रमेश सोळसे यांचे म्हणणे आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला होता. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच रमेश यांची पत्नी आशा यांचा फोटो गीताला दाखवण्यात आला. मात्र, ही माझी आई नसल्याचे गीताने सांगितले आहे.