नाशिक - शहरात झालेल्या 18 बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून ही घटना का झाली, याबाबत सविस्तर खुलासा मागितला आहे. हा खुलासा समाधानकारक नसेल तर तातडीने त्यावर कारवाई करण्याचे देखील या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
फांदी कोसळून झाला होता तब्बल 18 बगळ्यांचा मृत्यू -
नाशिकमधील एका घटनेने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेच्या ठेकेदाराने झाड कापल्याने फांद्यावरील बगळ्याची घरटी खाली रस्त्यांवर कोसळून तब्बल 18 बगळ्यांचा आणि काही पिल्लांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पक्षी हे जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ही घटना समजताच पक्षीप्रेमी आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमी पक्षांना उपचारासाठी पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या संपूर्ण घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी वनविभागाने महानगरपालिकेला नोटीस बजावल्यानंतर महानगरपालिकेच्या पश्चिम विभागाकडून तातडीने श्रेया इंटरप्रायजेस यांना नोटीस बजावून ही घटना का घडली आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल सविस्तर खुलासा मागितला आहे. हा खुलासा आल्यानंतर पर्यावरणवादी पुढील भूमिका घेणार आहेत.