नाशिक - शहरासह उत्तर महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. अशा प्रकारे बदनामीकारक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रतन खालकर, संकेत भोसले , प्रमोद कहाकडे, राहुल दोशी आणि बंटी ठाकरे अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील रुग्णालयात जाऊन आढावा घेत होते. शुक्रवारी ते कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आले असता, तेथील काही तरुणांनी फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
व्हिडिओ झाला होता वायरल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , यांच्या सोबत यावेळी
प्रवीण दरेकर आणि आमदार गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात युवकांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
त्यानंतर याप्रकरणी नाशिक रोड भाजपा अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या तक्रार अर्जावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात रतन खालकर, संकेत भोसले , प्रमोद कहाकडे, राहुल दोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांविरोधात कलम 500, 501, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नाशिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बिजली हे करत आहेत.