नाशिक - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, नाशकातील कांद्याला भाव मिळावा आणि अमेरिकेने भारतीय कांद्याची मागणी करावी, यासाठी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ट्रम्प यांना कांदा भेट दिला आहे. तसेच एक भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पाठवली आहे.
निफाड तालुक्यातील नैताळे गावातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे आणि पत्नी शोभा साठे यांनी ही अनोखी शक्कल लढवण्याचे ठरवले आहे. साठे यांनी यापूर्वी बराक ओबामांची भेट घेतली असून आता डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा आहे. डोनाल्ड टॅम्प आणि त्यांची पत्नी 24 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहे. साठे दाम्पत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रीयन गांधी टोपी, उपरणे तसेच मेलनिया ट्रम्प यांच्यासाठी साडी आणि कांदे 13 फेब्रुवारी रोजी पाठविले आहेत.
![farmer gave gift to president donald trump, nashik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-lettertodonaldtrump-mh10018_15022020114308_1502f_1581747188_655.jpg)
साठे दाम्पत्याने यापूर्वी कांद्याच्या दरावरून गांधीगिरी मार्गाने निषेध केला होता. त्यांनी मातीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्याच्या विक्रीतून आलेल्या 1064 रुपयांची मनीऑर्डर थेट पंतप्रधान मोदींनी पाठवली होती. आता ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात कांद्याची मागणी करावी, जेणेकरून भारताला कांदा निर्यात करता येईल आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा साठे यांची आहे. त्यामुळेच त्यांनी ट्रम्प यांच्या पत्नीला कांदे भेट देण्याचे ठरवले आहे.
![farmer gave gift to president donald trump, nashik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-lettertodonaldtrump-mh10018_15022020114308_1502f_1581747188_168.jpg)
आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होते. या कांद्याची चव रुचकर आणि विशिष्ट असल्याने संपूर्ण जगात या कांद्याची मोठी मागणी असते. यंदा मात्र भारतात कांद्याचे बाजारभाव गगनाला भिडल्याने कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली आहे. परिणामी भारतात अतिरिक्त कांदा झाल्याने दर पडले आहेत. कांद्याचे बाजारभाव 85 टक्क्यांनी घसरल्याने कांदा उत्पादकांना झालेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादकांनाही भेटण्याची संधी द्यावी अशी विशेष मागणी केली आहे. त्यासाठी गांधीगीरी मार्गाचा अवलंब करत गांधीटोपी, उपरणे, साडी अशा भेटवस्तूंसह स्वतः मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदाही ट्रम्प यांना पाठवण्यात आला आहे. “आपल्या आहारात कांद्याचा उपयोग करून या रुचकर चविष्ट कांद्याचा आस्वाद घ्यावा. तसंच भारत दौऱ्या दरम्यान आपण आमच्या नाशिकच्या कांद्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कराल आणि कांदा उत्पादकांना नक्कीच भेटाल”, अशी अपेक्षा करणारं पत्र साठे यांनी लिहिले आहे.
नैताळे येथील या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबमा यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी जागतीक बदलते तापमान या विषयावर पाच मिनिटं चर्चा झाली होती. यंदा या कांदा उत्पादक शेतकऱ्याने पुन्हा दहा वर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.