नाशिक - विभागीय जिल्हा वार्षिक योजनांच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आज नाशिक दौऱ्यावर असून ह्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडलेला विभागीय कार्यालयाचा रस्ता मुरूम टाकून बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न नाशिक महानगरपालिकेने केला आहे. मात्र तरीसुद्धा खड्डे पूर्णतः बुजले नसल्याने खराब रस्त्याचा अनुभव मंत्री महोदयांना आला.
खड्ड्यांमधून करावा लागला प्रवास
अनेकदा खेडेगावात राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यावर प्रमुख पाहुणे ज्या मार्गाने जातील अशा ठिकाणचे रस्ते स्थानिक प्रशासनाच्या वतीने चकाचक केले जातात. मात्र या उलट नाशिकच्या खराब रस्त्याचा अनुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांना आला. आज नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्तर महाराष्ट्राची विभागीय वार्षिक नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील पालकमंत्री उपस्थित होते. मंत्रीगण येणार म्हणून अनेक वर्षपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून हे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आला, मात्र तरीसुद्धा खड्ड्यांमधून मंत्र्यांना प्रवास करावा लागला.
'प्रशासनाने जनतेसाठी काम करणे अपेक्षित'
पाच जिल्ह्याचे विभागीय कार्यालय नाशिक रोड भागात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील रस्ता खराब झाला असून याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही. आज उपमुख्यमंत्री या रस्त्याने जाणार म्हणून तात्पुरता मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला. खरे तर सरकार-प्रशासनाने जनतेसाठी काम करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही, असे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांनी म्हटले आहे.