नाशिक - नाशिकच्या सायकलपटू महिलेशी गैरवर्तन करणे कर्नाटक पोलिसांना महागात पडले आहे. कर्नाटकात प्रवेशासाठी सेटलमेंटची भाषा करणाऱ्या या पोलिसांविरोधात ( Karnataka Police Bribe To Women ) नाशिकच्या यामिनी खैरनार यांनी गुन्हा दाखल केला ( Complaint File Against Karnataka Police ) आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या सायकलपटू यामिनी खैरनार आपल्या कुटुंबासोबत सोलापूरहुन गाणगापूरकडे जात होत्या. तेव्हा कर्नाटकातील बालूर्गी चेकपोस्टजवळ दारुच्या नशेत असणाऱ्या तीन पोलिसांनी त्यांना अडवून कोरोना चाचणी रिपोर्टची मागणी केली. पण, कोरोना लसीचे दोन्ही ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवून सुद्धा त्यांना कर्नाटकात प्रवेश देण्यास नकार दिला. तसेच, तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला फोन करा नाहीतर आपण सेटलमेंट करू, असे पोलिसांनी सांगितले.
यावेळी यामिनी यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र मागताच त्या तिघांनी त्यांना गाडी खाली उतरण्यास भाग पाडून अरेरावीची भाषा सुरू केली. तेव्हा तिघांकडे ही मास्क नव्हते, आयकार्ड नव्हते व सगळ्यांनी दारू प्यायले होते, असे यामिनी यांनी सांगितले.
पोलिसांकडून मदत नाही
112 या पोलीस हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर दीड तासांनी तिथे पोलिस, आरोग्य आणि महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर यामिनी यांनी जवळील अफजलपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी पोलीस झोपले होते. पोलीस उपनिरीक्षक आणि इतरांनी यामिनी यांच्याशी हुज्जत घालत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर मध्यरात्री दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचे यामिनी यांनी सांगितले. या मानसिक छळानंतरही न डगमगता यामिनी यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
हेही वाचा - Amruta Fadnavis : मुंबईतील ट्राफिक जाम समस्येमुळे 3% घटस्फोट : अमृता फडणवीस