नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज विनामास्क नाशिकमध्ये दाखल झाले. तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांनादेखील मास्क काढण्याचा सल्ला दिल्याने ह्या घटनेचा सर्वच राजकीय नेत्यांनी निषेध नोंदवला. राज ठाकरे यांनी नको तिथे स्टंटबाजी करू नये, अशा प्रतिक्रियादेखील नाशिकच्या राजकीय नेत्यांची दिल्या.
महापौरांनाही मास्क काढण्याचा सल्ला?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये खासगी दौऱ्यावर असून राज ठाकरे हे विनामास्क नाशिकमध्ये दाखल झाले. अशात त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्याचा सल्ला दिला. एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत एक हजार रुपयांचा दंड आकाराला जात आहे. अशात एका पक्षाचे प्रमुख असलेले राज ठाकरे यांनी विनामास्क फिरुन कार्यकर्त्यांसमोर चुकीचा आदर्श निर्माण करू नये, असे मत नाशिकच्या राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राज ठाकरे यांच्यावरदेखील प्रशासनाने कारवाई करावी, असे मत राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांना प्रसिद्धीचे वलय आहे, त्यांनी तरी अशाप्रकारे वागू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.
'नको तिथे स्टंटबाजी करू नये'
उगाच कुठल्या गोष्टीत स्टंटबाजी करून आपण वेगळे आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. आता त्यांना काही शिकवावे आणि त्यांनी तसे वागावे, अशी आता परिस्थिती नाही. जर प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना मास्क नाही म्हणून एक हजार रुपयांचा दंड करते, मग पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांच्याबाबत कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी दिली आहे. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत आणि तेच जर असे वागत असतील, तर त्यांच्यामुळे त्यांना स्वतःसह कार्यकर्त्यांना आणि समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे.