नाशिक - शहरात कोरोनाकाळात कमी झालेल्या गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढले असून अनलॉकनंतर गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील चार महिन्यात शहरात 171 हाणामारी, 78 लुटमारीच्या घटना आणि 12 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली आहे. यामुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून, नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धार्मिक, अध्यात्मिक शहर म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. मात्र, आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहर हे गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून समोर येत असल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाकाळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती. मात्र, अनलॉकनंतर गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढले आहे. मागील चार महिन्यात नाशिकमध्ये 171 हाणामारी, 78 लुटमारीचीच्या घटना आणि 12 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद शहरातील 13 पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांचा वचक होतोय कमी
नाशिक आयुक्तालयाअंतर्गत 13 पोलीस ठाणे असून या सर्व पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना फ्री हँड दिले असूनसुद्धा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळेच सर्वच पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस कारवाईची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
तीन महिन्यांचे अल्टीमेटम
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी सर्वच पोलीस ठाण्याला दिला असून, उपनगर पोलिसांनी पहिलीच मोठी कारवाई करत म्हस्के टोळीतील 23 गुन्हेगारांना मोक्का लावला आहे.
चेन स्नाचिंगच्या घटनांमध्ये वाढ
नाशिकमध्ये चेन स्नाचिंगच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगार रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलांना लक्ष करत असून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या ओरबडून पसार होत आहेत. मात्र, या घटना रोखण्यात पोलिसांना अद्याप यश मिळत नाही.
पोलिसांनी गस्त वाढवावी
अनलॉकनंतर अचानक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात सर्वाधिक हाणामारीच्या घटना वाढल्या असून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे शहरात वावर वाढल्याने या गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलिसांकडून करण्यात येत असलेले कोंबिंग ऑपरेशन देखील थंडावले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
अनलॉकनंतर गुन्ह्याची आकडेवारी
अंबड पोलीस स्टेशन - हाणामारी 25, लूट 11
उपनगर पोलीस स्टेशन-हाणामारी 18, लूट 7,खून 1
पंचवटी पोलीस स्टेशन-हाणामारी 15, लूट 12
भद्रकाली पोलीस स्टेशन -हाणामारी 25, लूट 5, खून 1
मुंबई नाका पोलीस स्टेशन- हाणामारी 16, लूट 9, खून 1
नाशिक रोड पोलीस स्टेशन -हाणामारी 23, लूट 7, खून 1
सरकारवाडा पोलीस स्टेशन -हाणामारी 7, लूट 5, खून 1
आडगाव पोलीस स्टेशन- हाणामारी 5, लूट 5, खून 2
महसुळ पोलीस स्टेशन- हाणामारी 7, लूट 2, खून 1
गंगापूर पोलीस स्टेशन- हाणामारी 19, लूट 8, खून 1
सातपूर पोलीस स्टेशन- हाणामारी 10, लूट 2, खून 1
इंदिरा नगर पोलीस स्टेशन- हाणामारी 13, लूट 5, खून 1
देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन- हाणामारी 6
हेही वाचा -'सॅनिटायझर' पाजल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
हेही वाचा - गुन्हेगारांसोबत काढलेल्या फोटोवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण