नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक शहर पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी रत्नागिरीच्या पाेलीस अधीक्षकांना फाेन करुन विनंती केली. कायद्याच्या तरतुदीनुसार राणे यांना अटक करुन त्यांचा ताबा नाशिक पाेलिसांकडे द्यावा. त्यानंतर, रत्नागिरी किंवा नाशिकच्या न्यायालयात त्यांना हजर केले अशी माहिती पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यानी दिली आहे.
राणेंच्या अटकेचा आदेश ‘लीक'; सखाेल चाैकशी केली जाणार-पांडेय
मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक असून त्यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असभ्य भाषेत टीका केली. या प्रकरणी महानगरप्रमुख बडगुजर यांनी तक्रार दाखल केली आहे. मी असताे तर, मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली असती असे वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करुन पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अटकेचा आदेश जारी केल्यावर ताे गाेपनीय असतानाही लीक झाला. या संवेदनशील बाबी लीक कशा झाल्या याचा सखाेल तपास केला जाणार असल्याची माहिती दीपक पांडेय यांनी दिली आहे.
अटकेचा आदेश काढणारे पाेलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत का?
घटनात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बेजाबावदार वक्तव्य करुन घटनात्मक पदावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे माेकळे झाले खरे. मात्र, त्याचे पडसाद नाशिकसह महाराष्ट्रात उमटले. दगडफेक, ताेडफाेड, भाजपा-शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाेलिसांना साैम्य लाठीमार करावा लागला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांच्या सायबर पाेलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची तयारी केली आहे, असे समजताच नारायण राणे भडकले. 'अटक करायला मी नॉर्मल माणूस वाटलो का? अटकेचा आदेश काढणारे पाेलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत का?' असा सवाल राणेंनी यांनी केला. त्यावर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत लाॅ ऑफ रुल, कायदा सर्वांनाच सारखा आहे. त्यानुसार गुन्ह्याचे स्वरुप, त्याचे पडसाद पाहता ही कारवाई केल्याचे पांडेय यांनी सांगितले. यात सर्वच प्राेटाेकाॅल, प्रिव्हिलेज पाळले जातील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पाेलीस आधिकाऱ्यांचे पथक पुण्याकडे रवाना झाले. तेथून ते थेट चिपळूणकडे न जाता रत्नागिरीला रवाना झाले आहे.
राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावे
'शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. राणेंना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावें' असे पांडेय यांनी स्पष्ट केले.
प्रोटाेकाॅल पाळणार
'नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेच्या कारवाईनंतर राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयडी, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी या सर्वांना अटकेची माहिती दिली जाईल. राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना ती मुभा नाही. 'फॅक्ट ऑफ द केस' पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहिती आदेशात आहे, ‘रुल ऑफ लाॅ’ नसार कारवाई हाेईल असे पांडेय यांनी स्पष्ट केले.
गुंडांना गुंडांसारखीच ट्रिटमेंट
भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठाेर कारवाई केली जाईल. साेबतच त्यांचे जामीन झाले तरी, चॅप्टर केसेस टाकून ते तुरुंगात कसे राहतील, या दृष्टीने काम केले जाईल असे पांडेय यांनी सांगितले. कायदा माेठा आहे, काेणताही पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. ‘रुल ऑफ लाॅ’ महत्त्वाचे आहे. गुंडासारखे वागाल तर, गुंडासारखेच वागवू, असे असेही पांडेय यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर नाशिक शहर पोलीस शिवसेना- भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण भाजप त्यांच्या पाठीशी - देवेंद्र फडणवीस