नाशिक - लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने तब्बल अडीच महिन्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आहेत. मात्र दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी केलीय. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची परिस्थिती शहरात आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोनाबधितांचा आकडा देखील वाढलाय. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास सर्व निर्बंध मागे घेण्यात येतील, असे संकेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.
गर्दीत देखील नागरिकांनी मास्क नावापुरतेच घातल्याचे दिसून आले. गेल्या चार दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. एक जूनला शहरात 234 कोरोनाबाधित रुग्ण होते. आता हा आकडा 450 वर गेला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दुकानदार तसेच नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन न केल्यास सर्व शिथिलतेबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे संकेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहे.