नाशिक - केंद्र सरकारने खासगी कंपन्यांच्या रेल्वेगाड्या चालवण्यास तसेच रेल्वेच्या अनेक विभागाचे खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात सिटूच्या वतीने (भारतीय ट्रेड यूनियन केंद्र) शुक्रवारी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. तसेच सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांसह इतर निदर्शकांनी रेल्वे प्रबंधक आर. के. कोठार यांना निवेदन देखील दिले आहे.
केंद्र सरकारने 109 मार्गावर 151 खासगी कंपन्यांच्या रेल्वेगाड्या चालवण्याचा तसेच रेल्वेच्या अनेक विभागाचे खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शुक्रवारी याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले. सिटू आणि रेल्वे मजदूर युनियन संघ यांच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यात नाशिक शहरातील नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सिटू आणि मजदूर युनियन संघ कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - जम्मू-काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; कुलगाम भागात चकमक
फिजिकल डिस्टन्स ठेवून आणि हातात फलक घेऊन हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच डॉक्टर कराड यांच्या नेतृत्वात रेल्वे प्रबंधक आर. के. कोठार यांना खासगीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी निवेदन देण्यात आले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यासह मुंबई, भांडुप, विरार, भिवंडी यांसह राज्यातील इतर अनेक ठिकाणी असेच आंदोलन करण्यात आले. नाशिक येथील या आंदोलनात तुकाराम सोनजे, मोहन जाधव, हिरामण तेलोरे, संजय पवार, साहेबराव घुमरे, स्वरूप वाघ, शिवाजी फणसे, भगवान खाडे, बाळू जाधव, विजय गांगुर्डे, राजेश शेंडे यांसह सिटू आणि रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.