नाशिक - देवळालीत बिबट्याच्या भीतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी खडा पहारा द्यावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून देवळालीतील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी रात्री बान्स स्कूल भागातील शिवानंद गेस्ट हाऊसच्या भिंतीवर बिबट्या ठाण मांडून बसल्याने परिसरात घबराट निर्माण झाली.
हेही वाचा... नेपाळमध्ये जोरदार भूकंप; दिल्लीपर्यंत जाणवले हादरे
विजय नगर, भगुर, रेस्टकॅम्प रोड, खंडोबा टेकडी, धोंडीरोड आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. बान्स स्कूल परिसरातील शिवानंद कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या बाहेरील भिंतीवर रात्री व पहाटे बिबट्याने ठाण मांडल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील याच भागातील एका बंगल्याच्या आवारात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
हेही वाचा... 'त्या' बैलाला पशुवैद्यकीय किंवा वन विभागाच्या मदतीने मारता आले असते - राजू शेट्टी
काही दिवसांपूर्वी एका घरासमोरील गायीचा बिबट्याने फडशा पडला होता. तसेच लष्कर परिसर असलेल्या खंडोबा टेकडीवरील रणगाड्यावर बिबट्याने विश्रांती घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्या विनय सोसायटीमधील नागरिक आणि राम मंदिर सेवक मित्र मंडळाचे कार्यकर्ते सध्या या भागात रोज रात्री लाठ्या काठ्या घेऊन खडा पहारा देत आहे. गेल्या अनेक दिवसापासून बान्स स्कूल रोड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने येथे पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहे.