नाशिक - कोरोनाचा फटका भारतात सर्वाधिक पोल्ट्री आणि चिकन व्यवसायावर झाला आहे. चिकन खाल्याने कोरोनाची लागण होते, या अफवेमुळे नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून चिकन खाणे बंद केले आहे. परिणामी याचा फटका पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. कालपर्यंत 115 रुपये किलोने विकले जाणारे चिकन आज थेट 40 रुपये किलोने विकले जात आहे. स्वस्तात चिकन मिळतं असल्याने ग्राहकांनीही दुकानांवर गर्दी केली आहे.
एका अफवेमुळे करोडो रुपयांची उलाढाल होणारा पोल्ट्री उद्योग अडचणीत सापडला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील काही दिवसात चिकनचे दर अजून खाली येण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. चिकनबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी पोल्ट्री व्यावसायिकांनी एकत्रित येत नाशिकच्या डोंगरे वस्तीगृह येथे दोन दिवसीय चिकन फेस्टिवलचे आयोजन केले होते. यात 35 रुपयेमध्ये चिकन बिर्याणी ग्राहकांना देण्यात आली होती. या दोन दिवसात 22 हजार किलो चिकनची विक्री झाली होती. यानंतर तरी परिस्थिती सुधारेल असे पोल्ट्री व्यावसायिकांना वाटत होते. तसेच सरकारने यात हस्तक्षेप करून मार्ग काढावा, असे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.
हेही वाचा -
येस बँकेवरील संकटावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
येस बँकेवरील आर्थिक संकटानंतर महाराष्ट्र सरकारने 'हा' घेतला मोठा निर्णय