नाशिक - शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून बंडखोर नेते भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे सत्तेत बसले, अशी टीका करण्यात येत आहे. त्याला आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आमच्यात भांडण होतं. पण सन २००८ साली मानहानीवा दावा सेना नेत्यांच्या विनंतीवरुन मी मागे घेतला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या निरोपावरुन मातोश्रीवर चहापानाला व नंतर सहपरिवार जेवायला गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला माफ केलं, अशी आठवण करुन देत भुजबळांनी शिंदे गटातील नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले ( Chhagan Bhujbal Reply Shivsena Rebel Mla ) आहे.
'बाळासाहेबांना अटक करायची...' - भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेर पडलो. मुंबई दंगल प्रकरणी त्यावेळेचे पोलीस आयुक्त यांना सांगितले, बाळासाहेबांना अटक करायची नाही, जामीन मिळत असेल तर मिळून द्यावा. अटक करायची वेळ आली तर मातोश्री निवासस्थानी त्यांना अटकेत ठेवावे.
'बाळासाहेबांनी मला माफ केलं' - २००८ मध्ये सुभाष देसाई आणि संजय राऊत खटला मागे घ्यावा यासाठी भेटले होते. तो खटला मागे घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निरोप दिला की तुम्हाला चहाला बोलावले आहे. नंतर काही दिवसांनी आम्ही सहपरिवार गेलो. आमचं पाहिल्यासारखे प्रेम राहिले. एक वेळ आली की बाळासाहेबांनी मला माफ केले. अशी आठवण भुजबळ यांनी यावेळी करुन दिली.
'शिवसेना संपावी असे...' - आमचे वादविवाद आहेत, भांडणे होती. पण आताचे मुख्यमंत्री माझ्या शेजारी बसायचे. शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. एकमेकांवर कटू प्रहार करू नये. शिवसैनिकांच्या रक्तात सेना आहे. त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही. एक वादळ उठलय. हे वादळ कधीतरी शांत होईल. मग एकमेकांचे आवाज ऐकू येतील. शिवसेना एकत्र असली पाहिजे, अशी अपेक्षाही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Uday Samant : शिवसेना पक्षावर दावा ठोकणार का?, उदय सामंतांनी स्पष्टचं सांगितलं...