नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार असून शरद पवार हे कुटूंब प्रमुख आहेत. त्यामुळे साहजिकच परिवारात कोणी चुकले तर त्यांना बोलण्याचा आणि समजवण्याचा अधिकार आहे. माझे काही चुकले तर ते माझा कान देखील धरतात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पन्नास वर्ष राजकीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शरद पवार यांचा नुसता अभ्यास नसून ते अनुभवी आहे. त्यादृष्टीने पक्षात कोणी चुकले असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगत पार्थ पवारांना ते जे बोलले ते योग्यच असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांनी पार्थ पवारांच्या मुद्यावर भुजबळ यांना छेडले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाही. कुटूंबात आजोबांना नातवाला समजवण्याचा अधिकार असतो, असे सांगत आम्ही सर्व एक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..त्यात आदित्य ठाकरेंचा कोणताही दोष नाही
अभिनेता सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. मी देखील गृह खाते सांभाळलेले आहे. विनाकारण जे नाही ते आहे म्हणून सारखे सारखे दाखवायचे व वातावरण तयार करायचे हे बरोबर नाही. चुकीचे असेल तर नक्की बोला. पण या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा कोणताही दोष नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात जो पक्ष सत्तेत असतो त्याकडे स्वाभाविकच विरोधी पक्षातील लोकांचा ओढा असतो. आता शिवसेना व दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे भाजपमधील काही लोक संपर्कात आहे. त्यांचे वडिल व आजोबा हे मुळ काँग्रेसी आहेत. त्यांच्यावर काँग्रेसचे संस्कार आहेत. त्यांच्या घरवापसीचा निर्णय हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार घेतील.
ज्योतिषी नसल्याचा राणेंना टोला...
भाजपा नेते नारायण राणे यांनी हे सरकार पडेल अशी टिका केली होती. त्यावर हे सरकार पडेल की टिकेल हे सांगायला मी ज्योतिष नाही , असा टोला भुजबळांनी नारायण राणे यांना लगावला.
तसेच पद्ममश्री पुरस्कारासाठी दोन समित्यांचे त्यांनी समर्थन केले. पद्ममश्री पुरस्कारासाठी अनेक दिग्गज मान्यवर आहे. त्यामुळे ठाकरे समितीकडून आलेल्या नावांची दुसर्या समितीतील ज्येष्ठ सदस्यांकडून आणखी छाणणी होईल. त्यात काही गैर नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.