नाशिक : साहित्य संमेलन घेण्याबाबत साहित्य मंडळ जो निर्णय घेईल त्याप्रमाणे नाशिककर आणि पालकमंत्री म्हणून मदत केली जाईल अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. मात्र कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साहित्य संमेलन लगेच घेणे उचित होणार नाही असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. यासंदर्भात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी छगन भुजबळ यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये ठरलेले साहित्य संमेलन आता स्थगित ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे संमेलनाचे कार्यवाह आणि निमंत्रकांनी साहित्य संमेलन घ्यायचे की नाही, याबाबत सर्वंकष भूमिका येत्या ३१ जुलैपर्यंत साहित्य महामंडळाकडे सादर करावी. तसे न केल्यास नाशिकचे नियाेजित साहित्य संमेलन रद्द केले जाईल, असे काैतिकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छंगन भुजबळ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह प्रा.शंकर बाेऱ्हाडे यांना पाठविण्यात आले आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
"९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत लोकहितवादी मंडळाची व स्वागत मंडळाची भूमिका जाणून घेतल्यावर संमेलन आणखी एक महिना स्थगित करायचे की, तूर्त या वर्षी साहित्य संमेलनच रद्द करायचे आणि झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून सर्वांना यातून मुक्त करायचे? यासंबंधीचा निर्णय साहित्य महामंडळाला घेण्यासाठी निमंत्रक म्हणून आपली भूमिका कळवावी. काहीच कळविले नाही तर आपण साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक नाही, असा अर्थ होईल. नाशिकमधील रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून सावधपणा दाखवून संमेलन स्थगित केले. हे साहित्य संमेलन जूनअखेर घेता येईल असा अंदाज होता. परंतु तोही कोरोनाने खोटा ठरविला. आता जुलै महिना संपत आला आहे. यापुढे साहित्य संमेलनाच्या स्थगितीचा निर्णय प्रलंबित ठेवणे शक्य नाही, म्हणूण हा पत्रप्रपंच आहे. आज कोरोनाची परिस्थिती नाशिकला साहित्य संमेलन घेण्यासारखी आहे का? महाराष्ट्र शासन व नाशिकचे प्रशासन संमेलन घेऊ देण्यास अनुकूल आहे का? नाशिकमधील व जिल्ह्यातील लोकांची संमेलन घेण्याबाबत या परिस्थितीत मनःस्थिती कशी आहे? आणि मुख्य म्हणजे आयोजक संस्था म्हणून आपली व लोकहितवादी मंडळाची व स्वागत मंडळाची याही परिस्थितीत वरील सर्व गोष्टींवर मात करून साहित्य संमेलन घेण्याची तयारी आहे का? तयारी असेल तर कधीपर्यंत म्हणजे कोणत्या महिन्याच्या कोणत्या आठवड्यात संमेलन घेण्याची तयारी आहे? महाराष्ट्र शासनाने (वर्ष उलटून गेल्यामुळे) अनुदान नाकारले तर काटकसरीचा मार्ग अनुसरला तरीही आटोपशीर साहित्य संमेलनाला आवश्यक असणारा निधी जमा होईल का? या सर्व प्रश्नांचा विचार करून संमेलनासंबंधीची लोकहितवादी मंडळाची व स्वागत मंडळाची भूमिका स्पष्टपणे कळवावी."
कोरोनामुळे साहित्य संमेलन घेणे योग्य होणार नाही - भुजबळ
नाशिकमध्ये आयोजित ९४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांनी पाठविलेल्या पत्रावर भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, साहित्य संमेलन हे कधी घ्यावे? कसे करावे? याबाबत निर्णय हा मराठी साहित्य महामंडळाने घ्यावा असे म्हटले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता किमान सध्या तरी साहित्य संमेलन घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे आता तातडीने त्यावर निर्णय घेणे अवघड असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाविषयी सध्या तरी संभ्रमावस्थाच असल्याचे यावरून दिसून येत आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, चिपळूणसह इतर पूरग्रस्त भागात करणार पाहणी