नाशिक - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा देखील आता वादात सापडली आहे. जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियम पायदळी तुडवत भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तूफान गर्दी केली होती. या प्रकरणी यात्रेचे आयोजक नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवेंविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमची जनआशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद यात्रा कोरोना नियमांचे पालन करुन केली जात आहे. लोकांच्या समस्या व ठिकठिकाणी कोव्हिड सेंटर अथवा इतर उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी लोकांमध्ये जावे लागते. पण गर्दी टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. केंद्राने राज्याला गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळात सण असल्याने कोव्हिड नियमांचे पालन होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, तसेच तिसऱ्या लाटेचेही शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेत प्रंचड गर्दी करत कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवले जात आहेत. अशा परिस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्री असल्यामुळे डॉ.भारती पवार यांच्यावर काळजी घेण्याची अधिकची जबाबदारी होती. मात्र, त्याच्याच जनआशीर्वाद यात्रेत त्यांना या जबाबदारीचे भान राहिले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
डॉ.पवार यांनी शनिवारी नाशिक शहरामधून त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. परंतु या जनआशीर्वाद यात्रेमध्ये कोरोना महामारीच्या नियमांचे कोणतेही पालन केले गेलेले दिसून आले नाही. कोरोना नियमांचे उल्लघन या जनआशीर्वाद यात्रेमध्ये करताना दिसून आले. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या दृष्टीने नाशिक पोलिसांनी या जनआशीर्वाद यात्रेविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत भाजपा शहर अध्यक्ष पालवे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही नियमांचे पालन केले आहे. मग पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल का केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमवंशी म्हणाले की, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान दरम्यान कायद्याचे उल्लंघन हे झालेले आहे. त्यांनी कोरोना महामारीच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे. जास्त गर्दी जमा करणे, तोंडावर मास्क न लावणे, यासारख्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे आम्ही हे गुन्हे दाखल केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंदिराबाहेर काळारामाची आरती करून यात्रेचा समारोप-
नाशिकच्या पाथर्डी फाटा येथून केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरा जवळ या यात्रेचा समारोप करण्यात आला. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेरूनच काळारामाची आरती करून या यात्रेचा समारोप केला आहे. दरम्यान शहरातल्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या जनआशीर्वाद यात्रेचं जागोजागी जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी ढोलताशांचा गजर तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि औक्षण करत ही यात्रा मार्गक्रमण करत मार्गस्थ झाली होती.