नाशिक - मुख्यमंत्री, गृहमंत्री नाशिकमध्ये असताना क्रांतीदिनी ‘पाेलीस तक्रार घेत नाही, या कारणातून पाेलीस आयुक्तालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या राजलक्ष्मी पिल्ले यांनी घर व कंपनी बांधण्याच्या वैयक्तिक कारणातून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पिल्ले यांनी स्टंटबाजी करुन पाेलीसांना वेठीस धरले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक करावाई करण्यात आल्याची माहिती सहायक पाेलीस आयुक्त साेहेल शेख यांनी दिली आहे..
काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या राजलक्ष्मी पिल्ले या महिलेच्या तक्रारीची दखल घेत हा वाद आर्थिक देवाणघेवाणीतून असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
९ ऑगस्ट राेजी रोजी दुपारच्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालय येथे राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी माझ्या तक्रारीची दखल घेत नाहीत, या कारणावरून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बंदोबस्तातील पोलीसांनी रोखून धरत थाबवले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यामुळे पिल्ले विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक देवाण-घेवणीतून वाद -
यासंदर्भात पाेलिसांनी चौकशी केली असता मधुसुदन पिल्ले आणि त्यांची पत्नी राजलक्ष्मी पिल्ले तसेच गणेश पाटील यांचे घर, कंपनी बांधण्याच्या आर्थिक व्यवहारावरून दोघांमध्ये वाद असल्याचे दिसून आले आहे. त्यात दोघांनीही एकमेकांविरुध्द वकीलामार्फत कायदेशीर नोटीसा पाठविल्या होत्या. तर दोघांनीही पोलिसांकडे अर्ज केले होते. त्यांनी आपापसात कोणताही लेखी करार केलेला नव्हता. चौकशीतसुध्दा त्यांनी आर्थिक व्यवहारावरुन वाद असल्याचे सांगितले आहे. तसे पोलीसांनी त्यांचे जबाबही नोंदवलेले आहेत. त्यांच्यात असलेला व्यवहार ही दिवाणी स्वरुपाची बाब आहे. दोन्ही गटांना माहिती असूनदेखील त्यांनी स्वतःच्या आर्थिक व्यवहाराचा दिवाणी वाद हा वेगवेगळ्या प्रकारे अंबड व इंदिरानगर पोलीस स्टेशनला अर्ज करून व पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून केला आहे.
राजलक्ष्मी यांनी पोलीसांकडे दिलेल्या जबाबात नमूद रकमेच्या वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने त्यांना त्या प्रकरणात लेखी करारनामा नसल्याने दावा रिकवरी न्यायालयात दाखल करण्याचे सांगितले होते. तथापि रिकव्हरी न्यायालयात दावा दाखल करणेकरीता आवश्यक त्या न्यायालयीन फीची रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने भविष्यात ती रक्कम उपलब्ध करुन दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी कबुल केले होते. तसेच हा प्रकार दिवाणी असला तरी दोघा गटांत फौजदारी स्वरुपाचा गुन्हा होऊ नये म्हणून संशयित अंकुश वरोडे, प्रदीप चव्हाण व अजय बागुल यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पिल्ले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड, सहायक पोलीस आयुक्त विभाग ३, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २ यांना कोणालाही समक्ष भेटून समस्या मांडलेली नसताना आत्मदहनाचा जो प्रयत्न केला तो निव्वळ देखावा आहे, असे पाेलीसांनी स्पष्ट केले आहे. त्यातून पोलिसांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.