नाशिक - शिवसेना खासदार भावना गवळी यांनी स्वतःच्या ट्रस्टची प्रायव्हेट कंपनी मध्ये स्थापना केली असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे एका संस्थेत रुपांतर केले आहे. तसेच यामाध्यमातून तब्बल 70 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या स्वीय सहाय्यकाच्या नावावर केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपा कार्यालयात भेट दिल्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भावना गवळी यांची 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान' ही एक संस्था आहे. त्या संस्थेचे रूपांतर हे त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये केले आहे. तसेच महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची सर्व कागदपत्र ही बोगस असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. याच बरोबर यामाध्यमातून गवळी यांनी 70 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्या पीच्या नावावर केली असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कारखाना खरेदीत भ्रष्ट्राचार झाल्याचा यापूर्वी केला आरोप-
खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पुढील दोन आठवड्यात कारवाई सुरू होणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी यांनी सर्व आरोप फेटाळून टाकले असून भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकरून करण्याची मागणी केली होती.
ईडीची कारवाई-
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी सोमैया यांनी केला होता. आज खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती.