नाशिक - कोरोना काळात आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे मोठे योगदान राहिले असून आहे. कोरोना काळात आरोग्याची देवता म्हणजेच धन्वंतरी देवतेने दिलेली ऋतु चर्या, दिनचर्या आणि वनस्पतीचे महत्व आज समस्त जगाला कळले आहे. त्यामुळे यंदाच्या धन्वंतरी जयंतीला वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे मत नाशिकचे प्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले आहे.
वैद्य जाधव म्हणाले, की आश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती आज नाशिक मध्ये सर्वत्र उत्साहात साजरी झाली. समुद्रमंथनातून प्रकटलेल्या चौदा रत्नां पैकी एक भगवान धन्वंतरी भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी प्रकट झाले. धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात. दिवाळीचा दुसऱ्या दिवशी भगवान धन्वंतरीची जयंती साजरी करण्यात येते. कोरोना काळात आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे मोठं योगदान लाभल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनस्पतींचा वापर महत्वाचा ठरला आहे.
धन्वंतरीच्या हातात चार आयुधे-धन्वंतरीच्या हातात चार आयुधे आहेत एका हातात शंख असून दुसर्या हातातील सूर्यदर्शन चक्र हे शल्यचिकित्सक यांचे प्रतीक आहे. तिसऱ्या हातातील जलोका अर्थात जळवा हा प्राणी अशुद्ध रक्त शोषून घेतात. आज जलोकाचा लंडनमधील रॉयल वैद्यकीय महाविद्यालयामध्येही कठीण प्लास्टिक सर्जरीमध्ये अवयव जोडण्यासाठी वापर केला जातो. तर चौथ्या हातातील अमृतकलश औषधाचे प्रतीक आहे.
नैवद्याचे वैशिष्ट-धन्वंतरी पूजेच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश असतो. शरीर व मनाच्या सात्त्विक गुणांची वाढ धातूंची झीज करून काढणाऱ्या द्रव्यांचा समावेश करून नैवद्य दाखवणे आणि सर्वांना प्रसाद म्हणून देण्याची पद्धत देशात आहे. धन्वंतरीला क्षीरतिलावन या दुधाचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे, साळीच्या लाह्या, खवा, बत्तासे, वेलची, सुंठ व किंचित मिरी टाकून दुधामध्ये एकजीव करून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण आवश्यकतेनुसार थोडा वेळ गरम करून हा नैवद्य म्हणून धन्वंतरी दाखवण्यात येतो, तसेच सर्वांना प्रसाद म्हणूही दिला जात असल्याची माहिती डॉ विक्रांत जाधव यांनी दिली.