नाशिक : नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रासह शहरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणात केवळ 40 दिवस पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिक शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
गंगापूर धरणात 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
नाशिकच्या गंगापूर धरणातून शहरातला पाणी पुरवठा केला जातो. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर सतिश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गंगापूर धरणात किती साठा शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली. सद्यस्थितीत धरणात 1900 एमसीएफटी जलसाठा शिल्लक असुन, त्यापैकी 800 एमसीएफटी मृतसाठा आहे. 300 एमसीएफटी पाणी रोटेशनसाठी, 200 एमसीएफटी पाणी एमआयडीसी व इतर वापरासाठी द्यावे लागते. हा एकूण 1300 एमसीएफटी साठा वगळता उर्वरित 600 एमसीएफटी जलसाठा हा नाशिककरांसाठी उपयोगात येणार आहे. दैनंदिन पाण्याचा वापर लक्षात घेता शिल्लक जलसाठा केवळ 40 दिवसच पुरेल एवढाच असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. त्यामुळेच पाण्याची बचत करण्यासाठी दर गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणी जपून वापरण्याच्या सूचना
नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जलसंकट निर्माण झालं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या देखील अडचणी आता वाढल्या आहेत. जिल्हयात अनेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास पेरण्या तर रखडतीलच. शिवाय दुबार पेरणीचे देखील संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने अनेक धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करण्याऱ्या गंगापूर धरणातही 40 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - EUROPE FLOODS : जर्मनी, बेल्जियममध्ये पुराने हाहाकार; 150 बळी