नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक ऑटोरिक्षा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत जाहीर केली होती. त्याबाबत परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वेळोवेळी आवाहन देखील केले होते. परंतु आतापर्यंत केवळ आठ हजार परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनीच लाभ घेतला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे.
शासनाच्या अनुदानकडे रिक्षाचालकांनी फिरवली पाठ
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षा बंद असल्याने रिक्षा चालकांना उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने 7 मे 2021 रोजी आदेश काढून राज्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील करण्यात आले होते. परंतु अनेक रिक्षा चालकांना योजनेची माहिती मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या दालनात शहरातील सर्व ऑटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करुन संबंधीत पदाधिकाऱ्यांना योजनेची माहिती जास्तीत जास्त ऑटोरिक्षा मालकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत सुमारे 8 हजार इतक्याच ऑटोरिक्षाधारकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे प्रादेशिक कार्यालयात मंगळवारी ऑटोरिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करुन जास्तीत जास्त ऑटोरिक्षाधारकांपर्यंत सदर योजनेची माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. तरी नाशिक जिल्हातील सर्व ऑटोरिक्षाधारकांनी शासनाने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यात 24 हजार 143 परवानाधारक
नाशिक जिल्ह्यात एकूण 24 हजार 143 परवानाधारक ऑटोरिक्षा चालक असून आतापर्यंत केवळ 8 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी राज्य शासनाने 1500 रुपये आर्थिक सहाय्याचा लाभ घेतला आहे. अद्याप 16 हजार 143 परवानाधारक ऑटोरिक्षा चालक बाकी आहेत. राहिलेल्या सर्वच ऑटोरिक्षा चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ऑटोरिक्षा चालक संघटनांनी देखील ऑटोरिक्षा चालकांपर्यंत शासनाच्या या योजनेची माहिती द्यावी. आरटीओ विभागामार्फत प्रत्येक रिक्षा स्टँडवर जाउन परिपत्रक देऊन या योजनेची माहिती दिली जाते तरी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे अशोक अढागळे श्रमिक रिक्षाचालक-मालक सेना शहर उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला जबर धक्का, बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव