नाशिक- महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असताना कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा केल्याच्या संशयाहून वादात असलेले आकाश बागुल हे अधिकारी पुन्हा एकदा पालिकेतील याच नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक पदावर रुजू झाले आहे. नाशिकच्या देवळाली शिवारातील भूसंपादनात 76 कोटींचा टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप बागुल यांच्यावर आहे.
बागुल या अधिकाऱ्याची तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी टीडीआर घोटाळ्याचा पुराव्यानिशी ठपका ठेवत चौकशी सुरू केली होती. मात्र, बागुल यांनी प्रकरण अंगाशी आल्याचे लक्षात येताच स्वतः या पदाहून बदली करून घेतली होती. ही चौकशी पूर्ण झालेली नसताना पालिकेत प्रशासकीय आणि राजकीय फेर बदल होताच बागुल यांना पुन्हा एकदा नगर रचना विभागाच्या संचालक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीने पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्याच भूमिकेवर संशय व्यक्त होऊ लागला आहे.
या प्रकरणी पालिकेतील विरोधी पक्षांनी योग्य वेळी जाब विचारू, असा इशारा दिला आहे. महापालिकेतील नगररचना विभाग आजवर एक न अनेक घोटाळ्यांनी चर्चेत राहिला आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि राजकीय नेत्याचे कुरण म्हणून हा विभाग सर्वश्रृत आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराने बरबटल्याच्या संशयाहून चौकशीत अडकलेल्या बागुलांची नियुक्ती नेमकी नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी की पूर्वीच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी झाला, असा प्रश्न या नियुक्तीने नागरिक उपस्थित करत आहेत.