नाशिक - मतदानासाठी अवघे दहा ते बारा दिवस शिल्लक राहिल्याने लोकसभा उमेदवारांनी आपली भिस्त स्टार प्रचारकांवर सोपविली आहे. शिवसेनेचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे यांनी नाशिक व सिन्नर येथे महायुतीची जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार संसदेत जाणारा हवा की मनी लाँड्रिंगसारख्या देशद्रोहासाठी जेलमध्ये जाणाऱ्यांना संधी द्याल, असा प्रश्न उपस्थित केला.
आदित्य ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. याचवेळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी पाच वर्षे केलेल्या विकासकामाचे त्यांनी कौतुक केले. गोडसे यांनी गेली पाच वर्षे नाशिकचा झपाट्याने विकास केला. त्यामुळे नाशिककरांना विकास करणारा खासदार हवा असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आम्ही निवडणुकीसाठी एकत्र आलोय. आता ही युती कधी तुटणार नाही, असा त्यांनी दावा केला. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी सेनेच्या स्टार प्रचारकांनी रविवारी नाशकात तळ ठोकला. तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरीमधून बंडखोर नेते, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि आघाडीवर चौफेर टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काहीअंशी चुरशीची झालेली पाहायला मिळत आहे.