नाशिक - आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मुलाने आईला मारहाण केली. या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून शहर परिसरात ह्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरातील राजवाड्यात कांताबाई काळे ह्या आपल्या मुलांसह राहत होत्या. काही दिवसांपूर्वी कांताबाई यांचा मुलगा हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, मुलाच्या या वाईट सवयीविषयी कांताबाईंचा विरोध असल्याने त्यांनी मुलगा कमलाकर काळे याला पैसे देण्यास नकार दिला. म्हणून त्याने कांताबाई यांना मारहाण केली होती. यात ८२ वर्षीय कांताबाई या जखमी झाल्या होत्या. यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कांताबाई यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या घटनेत आरोपी कमलाकर याने आपल्या लहान भावाला देखील मारहाण केली होती. लहान भाऊ या मारहाणीत जखमी झाल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली आहे. सातपूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ह्या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध केला जात आहे. याप्रकरणी आरोपी कमलाकर काळे याला पोलिसांनी अटक केली असून तर अधिक तपास पोलीस करत आहेत.