नाशिक - शहरात महानगरपालिका आणि जिल्हा रुग्णालयांसोबतच शहरातील 28 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी 1,576 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यावर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण असल्याची माहिती, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 5 हजारांच्यावर जाऊन पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात 266 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दररोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत असल्याने भविष्याचा विचार करता महानगरपालिकेने ठक्कर डोम इथे 350 बेड्सचे भव्य कोविड सेंटर उभारले आहे. तसेच शहरातील 28 खासगी रुग्णालयामधील 1500 बेड्स कोविडसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - चिंताजनक! राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू
सरकारी आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण 2216 बेड असून नाशिक जिल्ह्यात सध्या स्थितीत सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये 2062 रुग्ण उपचार सुरू आहेत. तर नाशिक शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये 1,444 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
जादा बिल आकरणाऱ्या शहरातील दोन नामांकित हॉस्पिटल वर मनपाची नोटिसा...
नाशिकमध्ये कोरोनाबधितांचा आकडा वाढत असून काही खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर महानगरपालिकेने अतिरिक्त बिल आकरणाऱ्या अशोक मेडिकव्हर आणि सह्याद्री हॉस्पिटलांना नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच शासनाच्या अधिनियमाने बिल आकारण्याबाबत प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये दर फलक लावण्यात आले आहे. या दरापेक्षा अधिक बिल आकारल्यास त्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे संकेत मनपा कडून देण्यात आले आहेत.
24 तासात लॅब कडून मिळतो कोरोना अहवाल..
नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल एफ.एम.सी. लॅब पुणे आणि नाशिकच्या एमव्हीपी रुग्णालयामधील लॅबकडून प्राप्त होतो. खासगी रुग्णालयांचे अहवाल मेट्रो, दतार, कृष्णा आणि एस.आर.एम या खासगी लॅबकडून 24 तासात प्राप्त होत आहे. यासाठी खासगी लॅब 2500 ते 2800 रुपये दर आकारत आहे.
हेही वाचा - वर्ल्डोमीटरनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर; अमेरिका प्रथम क्रमांकावर
कोविड होम पॅकेज..
नाशिकच्या काही खासगी हॉस्पिटलने कोविड होम पॅकेज तयार केले आहे. ज्यात कोरोनाबाधित रुग्ण घरात आयसोलेट होत असेल तर त्यांना 15 दिवसांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्यासाठी 6000 ते 8000 रुपये आकारले जात आहेत. त्यात बाधित रुग्णासाठी N-95 मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनिटाझर, छातीचा एक्सरे, दररोज तद्द डॉक्टर आणि नर्सचे व्हिडीओ कॉलद्वारे मार्गदर्शन, आहाराबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच औषधांसाठी मोफत घरपोच सेवा दिली जाणार आहे.