नाशिक - सिडको भागातील वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून दागिने चोरी करणाऱ्या दोन तरुणींना स्थानिक महिलांनी चोप देत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. यानंतर अंबड पोलीस ठाण्यात दोन संशयित तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सिडको भागातील दत्त चौक भागात घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला तरुणींनी लुटण्याचा प्रयत्न केला. दोन चोरट्या तरुणींनी त्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून अंगावरील सोने ओरबाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिसरातील महिलांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी या मुलींना पकडून त्यांना चोप देत पोलीस ठाण्यापर्यंत त्यांची धिंड काढली. मात्र, पोलिसांनी आम्हाला काही माहीत नाही, असे सांगून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यावर मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी एकत्रित येत गुन्हा दाखल करण्यास अंबड पोलिसांना भाग पाडले. त्यानंतर या दोन तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - नाशकात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सिडको, सातपूर, अंबड या औद्योगिक भागांमध्ये रात्रीच्या सुमारास लुटमारीच्या घटना वाढल्या असून त्यात आता महिला चोरट्यांचा सहभाग असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.